दाऊद गँगकडून मोठ्या प्रमाणावर होतोय बिटकॉइनचा वापर

जगभर क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचा वापर नेहमीच क्राईम किंवा गुन्हेगारांकडून होत असल्याचे आरोप होतात कारण ही करन्सी ट्रॅक करता येत नाही. भारतातील अंमलबजावणी संचालनालाच्या म्हणजे इडीच्या काही अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताचा सर्वाधिक वाँटेड गुन्हेगार दाऊद गँग कडून बिटकॉइनचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु झाला असून त्यासंदर्भात इडी तपास करत आहे.

बदलत्या काळानुसार दाऊद टोळीने त्यांच्या रणनीती मध्ये बदल केला आहे. काळा धंदा वाढविण्यासाठी डिजिटल टूल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असावा अशी शंका इडी विभागाला आहे. मनी लाँड्रींग मधून मिळालेल्या पैशातून बिटकॉइन खरेदी करून त्याचा वापर विदेशात मालमत्ता घेण्यासाठी केला जात असल्याचे धागे समोर येत आहेत. दाऊद टोळी अनेक बेकायदा धंदे करून पैसे गोळा करते. जुगार, ड्रग तस्करी, खंडणी उकळणे, खून या सारख्या व्यवहारातून मिळालेला पैसा बिटकॉइन खरेदी साठी वापरला जात आहे.

काळ्या धंद्यातून झालेली कमाई दाऊद सर्व डिजिटल वॉलेटच्या मदतीने बिटकॉइन खरेदीसाठी खर्च करत आहे आणि त्यातून अनेक मालमत्ता खरेदी केल्या जात आहेत. युएई त्यासाठी दाऊद टोळीचे पसंतीचे ठिकाण मानले जाते. युएई मध्ये पैसे पाठविण्यासाठी दाऊदचे मजबूत हवाला नेटवर्क कार्यरत आहे अशीही माहिती इडी ला मिळाली आहे.