तिरुपती देवस्थानम लाडू विक्रीतून मिळविणार ३६५ कोटी

आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध, श्रीमंत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने त्यांचा या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षात तिरुपती प्रसाद लाडू विक्रीतून ३६५ कोटी तर भाविकांनी दान केलेल्या केस विक्रीतून सुमारे १२६ कोटींचा महसूल मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्राचीन देवस्थानच्या संचालन बोर्डाने यंदाच्या बजेटला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. या बजेट नुसार २०२२-२३ या वर्षात देवस्थानाला ३०९६.४० कोटींचा महसूल मिळेल असे म्हटले गेले आहे. बोर्डाचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बरेड्डी व कार्यकारी अधिकारी केएस जवाहर यांनी मिडीयाला या संदर्भात माहिती दिली.

यंदाच्या वर्षात सुमारे १ हजार कोटी हुंडी मध्ये भाविकांनी टाकलेल्या पैशातून जमा होतील असा अंदाज आहे. बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवींच्या व्याजातून ६६८.५ कोटी मिळणार आहेत. दर्शन तिकीट विक्रीतून ३६२ कोटींचा महसूल मिळेल तर लाडू प्रसाद विक्रीतून ३६५ कोटी, निवास व्यवस्था आणि लग्न कार्यालय भाडे यापोटी ९५ कोटी, भाविकांनी दान केलेल्या केसांच्या विक्रीतून १२६ कोटी मिळतील असा अंदाज आहे. देवस्थान ला विविध सेवा देण्यासाठी वर्षात १३६० कोटींचा खर्च करावा लागेल असेही म्हटले गेले आहे.

तिरुपती देवस्थानाला भेट देणारे स्त्री पुरुष भाविक येथे आवर्जून केस दान करतात. त्यामुळे लक्ष्मी कृपा होते आणि पाप नाश होतो अशी भावना आहे. मंदिरात केश  कर्तनासाठी ६०० नाभिक नेमले गेलेले आहेत.