इस्रायलच्या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीची गिनीज बुक मध्ये नोंद
इस्रायल देश शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या इवल्याश्या देशात विविध प्रकारे आणि विविध प्रकारची फळे, फुले, भाज्या पिकविल्या जातात. चाही एरियल या इस्रायली शेतकऱ्याने जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी पिकविली असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे.
गिनीज बुक तर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुदार एरियलने पिकविलेल्या स्ट्रॉबेरीचे वजन स्ट्रॉबेरीच्या सरासरी वजनापेक्षा तब्बल पाच पट जास्त आहे. ही स्ट्रॉबेरी २८९ ग्राम वजनाची आहे. ही स्ट्रॉबेरी १८ सेंटीमीटर लांब आणि तिचा गोलाकार ३४ सेंटीमीटर आहे. २०२१ च्या सुरवातीला हवामान असामान्य पातळीवर थंड राहिल्याने स्ट्रॉबेरी पक्व होण्याची क्रिया मंद झाली आणि त्यामुळे स्ट्रॉबेरीचे वजन वाढत राहिले असे तज्ञ सांगतात.
एरियल चाही त्यांच्या स्ट्रॉबेरीने गिनीज बुक मध्ये नाव मिळविले यामुळे खूप आनंदी झाला असून त्याने गिनीज बुककडून मिळालेले प्रमाणपत्र शेअर केले आहे. तो म्हणतो, यावेळी माझी स्ट्रॉबेरी सर्वात मोठी ठरणार याची खात्री होती. त्यासाठी मी फार वाट पहिली. हा एक चांगला अद्भुत अनुभव आहे. मी आनंदाने गाणी म्हटली. चाही पूर्वी हे रेकॉर्ड एका जपानी शेतकऱ्यांच्या नावावर होते. २०१५ मध्ये या जपानी शेतकऱ्याने २५० ग्राम वजनाची स्ट्रॉबेरी पिकवून गिनीज बुक मध्ये नोंद केली होती.