मध्यप्रदेशात खासगी वाहनांना टोल मुक्ती

मध्यप्रदेश सरकारने खासगी छोट्या वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमात सुधारणा करून नवीन नियम तयार केले गेले असल्याचे समजते. यामुळे टोलप्लाझा वरील जाम आणि टोलच्या त्रासातून खासगी वाहन मालक मुक्त झाले आहेत. कार सह जी अन्य खासगी वाहने व्यावसायिक कारणासाठी वापरली जात नाहीत त्यांनाही टोल मधून मुक्ती दिली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य मार्ग विकास निगमच्या लोकनिर्माण विभागाने २०० रस्त्यांवर एक सर्व्हेक्षण केले होते. त्यात असे दिसून आले कि जमा होणाऱ्या टोल मधला ८० टक्के कर व्यावसायिक वाहनांकडून तर २० टक्के रक्कम खासगी वाहनांकडून जमा होते. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी खासगी वाहनांकडून जमा होत असलेल्या टोलची रक्कम इतकी कमी असेल तर त्यांना टोल मधून मुक्तता देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नियमात बदल करावा लागला. टोल मधून यापूर्वीच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, खासदार, आमदार, संरक्षण विभाग, पोलीस, फायरब्रीगेड अश्या २४ विविध कॅटेगरी मधून वगळले गेले आहे. आता खासगी वाहनांना वगळल्याने ही श्रेणी २५ झाली आहे.