संगीतकार भप्पी लाहिरी यांचे निधन

बॉलीवूडमध्ये हटके आणि तरुणाईला झिंग आणणाऱ्या अनोख्या संगीताची जादू पसरविणारे लोकप्रिय संगीतकार, गायक भप्पी लाहिरी यांचे मुंबईत आज निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते. मंगळवारी त्यांना घरी अस्वस्थ वाटू लागल्याने जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते तेथेच त्यांचे निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते आणि सोमवारी त्यांना घरी सोडले गेले होते पण मंगळवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरना घरी बोलाविण्यात आले तेव्हा त्यांनी हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला आणि हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना लाहिरी यांचे निधन झाले असे समजते. त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

१९७० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपटांन त्यांनी संगीत दिले होते आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. चलते चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, साहेब, सैलाब अश्या अनेक हिंदी तसेच बंगाली चित्रपटाना त्यांनी संगीत दिले होते. त्यांनी गायलेली काही गाणी सुद्धा खूपच लोकप्रिय झाली होती. त्यांनी शेवटचे गाणे २०२० मध्ये बागी ३ साठी गायले होते. लाहिरी यांना अनेक आजार होते. त्यांना झोपेमध्ये श्वास अडकण्याचा विकार होता असे समजते.

भप्पी यांचे खरे नाव अलोकेश लाहिरी असे होते. त्यांच्या परिवारात शास्त्रीय संगीताची परंपरा होती. त्यांचे वडील अपरेश प्रसिद्ध बंगाली गायक होते तर आई गायिका आणि संगीतकार होत्या. भप्पी यांच्या मागे पत्नी चित्रानी आणि मुलगी गायिका रेमा लाहिरी बन्सल आहेत. भप्पी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये जलपायगुरी येथे झाला होता.

चित्रपट जगतात लाहिरी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना सोन्याची प्रचंड आवड होती आणि भरगच्च दागिने ते घालत असत. काळा चष्मा आणि सोन्याच्या दागिन्यांनी लगडलेली त्यांची प्रतिमा प्रसिद्ध होती. यामुळे त्यांना गोल्ड मॅन असेही नाव मिळाले होते. २०१४ मध्ये त्यांनी प.बंगाल मधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविली होती पण राजकारणात ते यशस्वी झाले नव्हते.