करोना काळात आयटी कंपन्यांची रेकॉर्डतोड कमाई

भारतात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी करोना काळात रेकॉर्डतोड कमाई केली असून २०२१-२२ मध्ये आयटी कंपन्यांचा महसूल १५.५ टक्के वाढून २२७ अब्ज डॉलर्सवर गेला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाढ असल्याचे नॅसकॉमचे अध्यक्ष देबजनी घोष यांनी सांगितले.

घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ वर्ष आयटी कंपन्यांना अतिशय शानदार ठरले आहे. करोना काळात आयटी सेवा क्षेत्राच्या मागणीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे कंपन्यांची कमाई वाढली. चालू वित्त वर्षात झालेली १५.५ टक्के वाढ ही गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. २०२० -२१ मध्ये ही वाढ २.३ टक्के होती आणि एकूण महसूल त्यावेळी १९४ अब्ज डॉलर्स होता.

आयटी उद्योगात प्रत्यक्ष कर्मचारी संख्या ५० लाखावर गेली आणि ही संख्या गाठण्यासाठी या वर्षात ४.५ लाख नव्या नोकऱ्या दिल्या गेल्या. त्यात महिलांचे प्रमाण ४४ टक्के आहे. आता आयटी सेक्टर मध्ये महिलांची संख्या एकूण १८ लाखांवर गेली आहे असेही घोष यांनी सांगितले. या वर्षात निर्यातीत १७.२ टक्के वाढ होऊन ती १७८ अब्ज डॉलर्सवर गेली तर स्थानिक कमाई मध्ये १० टक्के वाढ होऊन ती ४९ अब्ज डॉलर्सवर गेली. डिजिटल सेवा हिस्सेदारी मध्ये २५ टक्के वाढ दिसून आली असून त्याचा महसूल १३ अब्ज डॉलर्स वर गेला आहे.

विशेष म्हणजे याच काळात आयटी क्षेत्रात नोकरी सोडण्याचे प्रमाण आणि वेग उच्च पातळीवर गेला असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे. तर डीजीटायझेशन मागणी वाढल्याने काही कंपन्यांनी २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याच्या सूचना दिल्याचे दिसून आले.