हे आहेत निळ्या रस्त्यांचे देश

भारत किंवा जगात कुठेही गेलो तरी रस्ते सारखेच असतात. म्हणजे काही देशात रस्ते अगदी गुळगुळीत असतील तर काही ठिकाणी खडबडीत असतील एवढाच फरक. पण रस्ते म्हटले कि एकजात काळे किंवा राखाडी कलरचे हे ठरलेलेच. पण काही देशात मात्र आता निळे रस्ते वापरले जात आहेत. हा रंग रस्त्यांचे सौंदर्य तर वाढवतोच पण हे रस्ते जणू आकाशाला भिडले आहेत असाही भास होतो.

असे रस्ते पहायचे असतील तर आपल्या, तुलनेने जवळच्या कतार देशात पाहायला मिळतील. येथील रस्त्यांचा नजारा वेगळाच आहे. भरधाव वेगाने या निळ्या रास्यांवरून जाणाऱ्या गाड्या नजर खिळवून ठेवतात. कतार मध्ये असे रस्ते २०१९ नंतर बांधले गेले आहेत. त्या अगोदर येथेही काळ्या किंवा राखाडी रंगाचेच रस्ते होते. ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा सध्या जगभर सुरु असून हा एक मोठा प्रश्न होऊन बसला आहे. जगभरातील अनेक देश तापमान नियंत्रणासाठी काही खास पावले टाकत आहेत. कतारमध्ये सुद्धा याच उद्देशाने रस्ते निळ्या रंगांचे केले गेले आहेत कारण हे रस्ते तापमानाचा बॅलंस साधण्याचे काम बजावतात.

काळे किंवा राखाडी रस्ते सर्वाधिक रेडीएशन शोषून घेतात आणि अधिक तापतात. त्यात अश्या रस्त्यांवर झाडे नसतील तर जास्त प्रमाणात उष्णता तयार होते. त्यामुळे अश्या रंगाच्या रस्त्यांचे तापमान २० ते २५ डिग्री पर्यंत वाढते. तुलनेने निळे रस्ते फार तापत नाहीत.

कतार प्रमाणेच जगातील अन्य काही शहरात सुद्धा असे निळे रस्ते तयार केले गेले आहेत. त्यात लास वेगास, मक्का आणि टोक्यो या शहरांचा समावेश आहे.