महाराष्ट्र एटीएसला मिळेनात अधिकारी
महाराष्ट्र पोलीस विभागातून एक धक्कादायक बात समोर आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यात एटीएस विभागात दोन पदे रिक्त असल्याचे नमूद करून त्यांच्या फेसबुक पेजवरून या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी संपर्क करण्याचे किंवा सोशल मिडिया माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन यात केले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य सरकाराला एक पत्र लिहून एटीएससाठी टीम मेम्बर्सची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक पेजवर एटीएस विभागात दोन पदे रिक्त असल्याचे नमूद केले होते. त्याचबरोबर एटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथक ही पोलीस विभागाची प्रतिष्टीत संस्था आहे आणि येथे नियुक्ती झालेल्यांना २५ हजार रुपये भत्ता मिळतो असेही म्हटले होते. मात्र तरीही या विभागात जाण्याची कुणालाही फारशी इच्छा नाही असे दिसून आले आहे.
काही माजी तसेच सध्या दहशतवाद विरोधी पथकात नियुक्त असलेल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या काही वर्षात त्यांची प्रतिष्ठा घालविली आहे. अनेक चर्चित आणि संवेदनशील गुन्हांच्या तपास एटीएस कडून काढून घेऊन एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला गेला आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य तपास यंत्रणा यांच्यातील दरी वाढली आहे.
अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार यांच्याकडे एटीएस मध्ये चार महत्वाची पदे रिकामी असल्याचे कळविले आहे. त्यातील दोन पदे एसपी दर्जाची, एक आयजी आणि एक डीआयजी अशी दोन अन्य पदे आहेत. ही पदे लवकर भरली गेली पाहिजेत असेही अग्रवाल यांनी कळविले आहे.