एअर इंडियाला मिळाले नवे सीईओ, इल्कर एयसी

तुर्की एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष इल्कर एयसी यांची एअर इंडियाचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. बोर्डाच्या  सोमवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना यावेळी विशेष आमंत्रण दिले गेले होते. गेल्या महिन्यात एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाकडे आला आहे. इल्कर एयसी १ एप्रिल किंवा त्यापूर्वीही नवीन पदभार स्वीकारतील असे सांगितले जात आहे.

या संदर्भात बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, इल्कर एयसी विमान उद्योगातील लीडर आहेत. तुर्की एअरलाईन्सचे नेतृत्व त्यांनी अतिशय यशस्वीपणे केले आहे. त्यांचे एअरइंडिया मध्ये स्वागत. नवीन युगात एअरइंडियाचे नेतृत्व त्यांच्या हाती सोपविले जात आहे.

इल्कर एयसी यांनी विल्केंट विश्वविद्यालयातून आणि लीड्स विद्यापीठात पोलिटीकल सायन्स विषयात संशोधन केले असून इस्तंबूलच्या मरमारा विद्यापीठातून १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध विषयात मास्टर्स डिग्री मिळविली आहे. ते तुर्कस्तान मध्ये मोठे व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. १९९४ मध्ये ते तुर्कस्थान राष्ट्रपतींचे सल्लागार होते. २०१५ ते २०२२ या काळात त्यांनी तुर्क एअरलाईन्सची जबाबदारी सांभाळली आहे. २००५ ते २०११ या काळात त्यांनी अनेक विमा कंपन्यांचे सीईओ म्हणून काम केले आहे.

इल्कर एयसी यांनी एअर इंडियाचे नेतृत्व करण्याची आणि त्या निमित्ताने टाटा समूहात सामील होण्याची संधी हा त्यांच्यासाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे. एअर इंडिया भारतीय अतिथ्याचे उत्तम प्रतिक असल्याचे आणि कंपनी सर्वोत्तम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.