मुंबईत सुरु होतेय वॉटर टॅक्सी सेवा

जलवाहतुकीला प्रोत्साहन आणि वाहतूक कोंडीमधून सुटका अश्या उद्देशाने मुंबई मध्ये १७ फेब्रुवारी पासून वॉटर टॅक्सी सेवा सुरु होत आहे. मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी, नेरूळ, एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी त्यामुळे प्रवाश्यांना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. यासाठी आवश्यक जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. १७ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य प्रवासी नवी मुंबई ते दक्षिण मुंबई प्रवास वॉटर टॅक्सीने करू शकणार आहेत.

इतर वेळी याच मार्गावर रस्ता मार्गाने जायला दीड ते दोन तास तर रेल्वेने जायला ५० ते ६० मिनिटे लागतात. जलवाहतूक सुरु झाल्यावर हेच अंतर ४० मिनिटात कापता येणार आहे. वॉटर टॅक्सीच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली गेली आहे. प्रवाशांना त्यासाठी ५ लाखाचे विमा कव्हर उपलब्ध केले जाणार आहे असे समजते. सध्या वॉटर टॅक्सी वाहतूक जबाबदारी खासगी कंपनी कडे सोपविली गेली असून या प्रवासाचे एक मार्गाचे तिकीट ७५० तर दोन्ही मार्गाचे तिकीट १२०० रूपये आहे. ११ हजार रुपये भरून मासिक पास मिळणार आहे.

या मार्गावर सेवा पुरविणारी मुख्य कंपनी सोहेल काझानी कडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप बुकिंगवर १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. सुरवातीला नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी, एलीफंटा नेरूळ असा मार्ग असून प्रत्येक थांब्यावर १० मिनिटे वेळ दिला गेला आहे. दर तासाला हे सेवा उपलब्ध आहे. गर्दी वाढल्यास अधिक वेळा फेऱ्या केल्या जाणार आहेत. जेट्टी पर्यंत येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.

प्रवासअगोदर अर्धा तास वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. इंधन दर वाढतील किंवा उतरतील त्याप्रमाणे तिकिटाचे दर कमी जास्त केले जातील असे सांगितले गेले आहे.