सिझनच्या पहिल्या आंबा पेटीचा ३१ हजाराला लिलाव

फळांचा राजा हापूस आंब्याची पहिली आवक पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती ( एपीएमसी मार्केट )मध्ये शुक्रवारी झाली असून येथे पहिल्या पेट्यांचा लिलाव केला गेला. त्यात देवगड हापूसच्या एका पेटीला विक्रमी बोली लागली. गेल्या ५० वर्षातील ही सर्वाधिक किंमत असल्याचे फळ व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

काची म्हणाले, आंबा खरेदीसाठी अक्षरशः झुंबड होती. सिझनचा पहिला आंबा दर वर्षीच्या परंपरेप्रमाणे लिलाव करून विकला गेला. पेटीचा दर ५ हजार रुपयापासून सुरु झाला आणि देवगड हापूसची पेटी ३१ हजार रुपयांना विकली गेली. या लिलावातून पुढचे दोन महिने बाजार कसा असेल याचा मार्ग दिसत असतो. यंदा लिलावात गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक बोली लागली.

मिळालेल्या माहितीनुसार लिलावापूर्वी सुद्धा काही पेट्या हजारोंच्या दराने विकल्या गेल्या. एक पेटी १८ हजार, दुसरी पेटी २१ हजार तर तिसऱ्या व चौथ्या पेटीला २२,५०० रुपये दर मिळाला. कोविड १९ मुळे गेली दोन वर्षे व्यापाऱ्यांना अडचणीची गेली. व्यवसाय जवळ जवळ ठप्प झाला होता. आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत आहे आणि आम्ही लवकरात लवकर सुरवात करू इच्छितो आहोत. ग्राहक सुद्धा प्रतीक्षा करत आहेत यामुळेच जास्त दर असूनही लिलावात आंबा पेट्याना चांगला दर मिळाला आहे.