रेल्वे प्रवास करताय, ३५ पैसे खर्चून मिळतो रेल्वे प्रवास विमा

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत असला तर तिकिटात केवळ ३५ पैसे अधिक भरून रेल्वे प्रवास विमा पर्याय उपलब्ध आहे याची अनेकांना माहिती नाही. इतक्या कमी पैशात मिळणारा हा विमा, रेल्वेला अपघात झालाच तर फार उपयुक्त ठरतो. नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी देते आणि १० लाख पर्यंत रकमेचा विमा यात घेता येतो.

समजा रेल्वे प्रवास विमा घेतला असेल आणि दुर्दैवाने त्या रेल्वेला अपघात झाला तर विविध श्रेणीनुसार विमा भरपाई मिळते. विमा घेताना आपला ई मेल आयडी व मोबाईल नंबर दिला कि विमा कंपनी कडून एक लिंक येते, तेथे जाऊन नॉमिनीचे नाव भरून डिटेल द्यावे, यामुळे क्लेम सहज मिळण्यास मदत होते. अपघातात प्रवाशांचे किती नुकसान झाले त्यानुसार विमा भरपाई मिळते. अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख, विकलांग झाल्यास १० लाख, थोडे अपंगत्व आल्यास सातेसात लाख, जखमी झाल्यास हॉस्पिटल खर्चापोटी २ लाख मिळतात. शिवाय मृत्यू झाल्यास १० लाख शिवाय पार्थिव घरी नेण्यासाठी १० हजार दिले जातात.

अपघात झाल्यास संबंधित व्यक्ती, नॉमिनी किंवा वारस विमा रक्कम क्लेम करू शकतात त्यासाठी विमा कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन आधार कार्ड, पॅनसारखी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. अपघात झाल्यापासून चार महिन्याच्या आत विमा क्लेमसाठी दावा करता येतो.