एका क्षुल्लक वाटणाऱ्या तांब्याच्या प्राचीन नाण्याचे तुकडे कापून होणार लिलाव

नुसते पहिले तर क्षुल्लक वाटणारे एक प्राचीन तांब्याचे नाणे सध्या चर्चेत आले असून या नाण्याचे शेकडो तुकडे करून ते लिलावात विकले जाणार आहेत. त्याकाळी वन पेनी म्हणजे आपल्या भाषेत एक पैसा किमतीच्या या नाण्याची आजची किंमत २ कोटी रुपये आहे. या नाण्याच्या खरेदीसाठी अनेक ग्राहक तयार आहेत पण कुणा एकाच ग्राहकाला ते विकले जाणार नाही.

मिडिया रिपोर्ट नुसार या नाण्यावर ब्रिटीश शासक किंवा राजा एडवर्ड आठवा याची प्रतिमा आहे. हा राजा अवघे ११ महिने सिंहासनावर होता. हे नाणे १९३७ मध्ये चलनात आणले जाणार होते. पण राज्यावर आलेल्या एडवर्ड आठवा याने वॉलीस सिम्पसन या विधवा अमेरिकन महिलेशी विवाह केला आणि त्यासाठी त्याला राजगादी सोडावी लागली. हे साल होते १९३६. त्यामुळे १९३७ मध्ये हे तांब्याचे एक पेनी किमतीचे नाणे चलनात आलेच नाही.

त्यानंतर १९७८ मध्ये हे नाणे २५ लाख रुपयांना विकले गेले आणि २०१९ मध्ये त्याला १ कोटी ३४ लाख रुपये किंमत मिळाली. आज या नाण्याची किंमत २ कोटी आहे. या नाण्याचे ४ हजार भाग करून एका भागासाठी ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र तरीही कुणाही व्यक्तीला जास्तीत जास्त ४०० भाग विकत घेता येणार आहेत असे समजते. ८ मार्च पासून त्याचा ऑनलाईन लिलाव शोपीस डॉट कॉम वर सुरु होणार आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार या नाण्याशी एक महत्वाचा इतिहास जोडला गेला आहे. त्यामुळे त्याचे आकर्षण मोठे असून अनेकाना ते खरेदी करायचे आहे. भविष्यात या नाण्याची किंमत अजून वाढेल अशी खात्री दिली जात आहे.