चीनची रहस्यमयी टेराकोटा आर्मी

चीनच्या पुरातत्व विभागाने चीनचा पहिला शासक किन शी हुआंग याच्या गुप्त कबरीतून नवीन २० टेराकोटा योद्धे शोधले आहे. किन हुआंग इसवीसन पूर्व २५९ ते २१० मध्ये चीनचा शासक किंवा राजा होता. या राजाच्या कबरीजवळ ८ हजार असे टेराकोटा योद्धे असलेले सैन्य होते. त्यातील २ हजार सैनिक विविध ठिकाणी उत्खननात मिळाले आहेत. नुकतेच मिळालेले २० योद्धे एकदम नवे आहेत.

२९ मार्च १९७४ मध्ये एका शेतकऱ्याला विहीर खोदताना सर्वप्रथम हे टेराकोटा सैन्य सापडले होते. त्या नंतर सरकारने आसपासची सर्व जमीन ताब्यात घेऊन तेथे उत्खनन सुरु केले होते. त्यात आत्तापर्यंत सुमारे २ हजार सैनिक सापडले आहेत. असे म्हणतात कि राजाच्या कबरीच्या रक्षणासाठी हे मातीचे सैन्य बनविले गेले होते. यात पायदळ, रथधारी, जनरल असे विविध हुद्दे असलेले सैनिक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पोशाख वेगळे आहेतच पण सर्वांचे चेहरे, त्यावरचे भाव सुद्धा वेगळे आहेत.

किन शी हुआंगची कबर २२०० वर्षे जुनी असून ती २४९ फुट उंचीच्या पिरामिड खाली होती. या कबरीची लांबी १ मैलापेक्षा जास्त आहे असे सांगतात. या कबरीच्या रक्षणासाठी बनविलेल्या या मातीच्या सैनिकांच्या हातात तलवारी, भाले, धनुष्य अशी विविध शस्त्रे आहेत. मातीपासून हे सैनिक बनविताना प्रथम डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळे भाग बनविले गेले आणि नंतर ते भट्टीत भाजून जोडले गेले असे मानले जाते.

किन शी हुआंग सत्तेवर आला तेव्हा तो १२ वर्षाचा होता. साम्राज्य स्थापल्यावर त्याने अशी सेना तयार केली जी कुणालाही हरवू शकत असे. याच सम्राटाने चीनची भिंत बांधायची सुरवात केली होती. त्यानंतर हजारो वर्षे त्यांच्याच वंशजांनी चीन वर राज्य केले होते.