रतन टाटाना भावली नॅनो इव्ही, मारली रपेट

दिग्गज ऑटो कंपनी टाटा मोटर्सने देशात सर्वात स्वस्त आणि सर्वसामान्य जनतेसाठी नॅनो कारची निर्मिती करून इतिहास घडविला होता मात्र नंतर या कारचे उत्पादन बंद केले गेले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनीच नॅनोचे स्वप्न पाहिले होते आणि प्रत्यक्षात आणले होते. त्यामुळे नॅनो त्यांची खास आवडती कार होती. पुणे येथील इलेक्ट्रा इव्हीने त्याच नॅनोचे इलेक्ट्रिक व्हेरीयंट तयार करून रतन टाटा यांना दिले असून या गाडीच्या प्रेमात पडलेले रतन टाटा नॅनो मधून फेरफटका मारायचा मोह आवरू शकले नाहीत.

इलेक्ट्रा इव्ही कंपनीने लिंकडेनवर या संदर्भातला एक फोटो शेअर केला असून त्यात नॅनो इव्ही शेजारी उभे असलेले रतन टाटा आणि त्यांचा सहकारी शंतनू नायडू दिसत आहेत. रतनजीना ही कार खूपच आवडली असल्याचे सांगितले आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये, ‘टीम इलेक्ट्रा इव्ही साठी हा प्रसंग म्हणजे ‘मोमेंट ऑफ ट्रुथ’ बनला जेव्हा आमच्या संस्थापकांनी कस्टम बिल्ट नॅनो मधून एक चक्कर मारल्याचे नमूद केले आहे. रतन टाटा यांना नॅनो इव्ही डिलिव्हर करून त्यांच्याकडून फीडबॅक मिळाला यामुळे गौरव झाल्याची भावना असल्याचेही यात म्हटले गेले आहे.

नॅनो इव्ही चार सीटर इव्ही असून तिची रेंज १६० किमी आहे. १० सेकंदापेक्षा कमी वेळात ती ० ते ६० किमीचा वेग घेऊ शकते. या कार साठी लिथियम बॅटरीचा वापर केला गेला आहे. ही कार अजून बाजारात आलेली नाही मात्र तिची किंमत साधारण ३ लाख असेल असे सांगितले जात आहे.