भूचुंबकिय वादळामुळे स्टारलिंकचे ४० सॅटेलाईट नष्ट

एलोन मस्क यांच्या स्पेस एक्सने लाँच केलेल्या ४९ हायस्पीड इंटरनेट स्टारलिंक सॅटेलाईट पैकी ४० सॅटेलाईट ४ फेब्रुवारी रोजी आलेल्या भूचुंबकीय वादळामुळे नष्ट झाल्याचे समजते. हे वादळ होण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटर मधून फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून १३० मैल अंतरावरील कक्षेत लाँच केले गेले होते. हॉवर्ड मधील स्मिथसोनीय अॅस्ट्रोफिजीसिस्ट जोनाथन मॅकडॉकेल यांनी बुधवारी झालेल्या भूचुंबकीय वादळात एकाचवेळी इतक्या मोठ्या संखेने सॅटेलाईट नष्ट होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले आहे.

हे सॅटेलाईट अंतराळात जळून गेले आहेत आणि त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही असे मस्क यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले हे सॅटेलाईट धातू पासून बनविले गेलेले नाहीत. त्यामुळे ते पृथ्वीच्या कक्षेत आले तर तेथेच जाळून जातात आणि त्यांची राख होते. वादळ सुरु असताना सॅटेलाईट सेफ मोड मध्ये नेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यश आले नाही. जळलेल्या सॅटेलाईटची अन्य दुसऱ्या सॅटेलाईट बरोबर टक्कर होण्याची कोणतीही शक्यता नाही असेही मस्क यांचे म्हणणे आहे.

भूचुंबकीय सौर वादळे अंतराळातील वातावरणावर मोठा प्रभाव टाकतात. सुर्यामधून अतिचुम्बकिय कण निघतात त्यातून अशी वादळे होतात. पृथ्वीवरील विद्युत व त्याच्याशी संबंधित प्रक्रियेवर त्यामुळे प्रभाव पडू शकतो. अनेकदा सॅटेलाईट मुळे पृथ्वीवरील इलेक्ट्रिक ग्रीडवर सुद्धा प्रभाव पडतो असे वैज्ञानिक सांगतात.