मतदानाला गेलेच नाहीत आरएलडी प्रमुख जयंत चौधरी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदांनाची टक्केवारी चांगली असली तरी समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून रिंगणात उतरलेले राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी स्वतः मात्र मतदानाला गेले नसल्याचे समोर आले आहे. पक्षप्रमुखाने स्वतःच मतदानाचा अधिकार न बजावल्याने भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. जयंत चौधरी या दिवशी बिजनौर येथील प्रचार सभेत अखिलेश यादव यांच्यबरोबर होते. त्यांना मथुरा येथे त्यांचा मतदान हक्क बजावायचा होता आणि सायंकाळी आपण मतदान करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र मतदानाची सायंकाळची ६ वाजेपर्यंतची वेळ संपल्यावर सुद्धा जयंत चौधरी मथुरेत आले नव्हते असे समजते.
ही संधी साधून भाजप अध्यक्ष जे पी नद्डा यांनी सीतापुर सभेत बोलताना एका नेत्यानेच मतदानाचा हक्क बजावला नाही, हे त्यांच्या वंशवादी अहंकाराचे प्रतिक असल्याची टीका केली. त्याला उत्तर देताना जयंत चौधरी यांनी मतदानाचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा यात फार कमी वेळ असल्याचे आणि राज्यात आघाडी करून निवडणूक लढवत असल्याने पक्षाच्या उमेदवारासाठी मत मागणे आवश्यक असल्याने अखिलेश यांच्या सोबत बिजनौर येथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि मतदान करू शकलो नाही असे सांगितले आहे. जयंत यांच्या पत्नी चारू यांनी त्यांचा मतदानाचा हक्क मथुरेत बजावला आहे. बिजनौर येथे १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. आणि या मतदार संघासाठी समाजवादी आणि रालोद ने पूर्ण ताकद लावली आहे.