नोकियाने गुपचूप लाँच केला नोकिया १०५ फिचर फोन

एचएमडी ग्लोबलने आफ्रिकेसाठी खास डिझाईनचा नवा फिचर फोन नोकिया १०५ आफ्रिकी एडिशन नावाने लाँच केला आहे. २०१९ प्रमाणेच दिसत असलेला फोन गतवर्षी फोर जी कनेक्शन व्हर्जन मध्ये सादर झाला होता. नव्या फोन मध्ये सुद्धा कंपनीने त्याचे खास डिझाईन कायम ठेवले आहे. हे डिझाईन हीच नोकियाची खास ओळख आहे.

आफ्रिकी एडिशन नोकिया १०५ मध्ये १.७७ इंची स्क्रीन दिला गेला असून लोकप्रिय स्नेक सहित १० गेम्स त्यात इंस्टोल केले गेले आहेत. पॉलीकर्बोनेट शेल असून ४ जीबी रॅम व ४ एमबी स्टोरेज आहे. फोन सिरीज एस ३० प्लस ओएस वर चालतो. त्याला टू जी सपोर्ट आहे. ८०० एमएएच बॅटरी असून फोन १८ दिवस चार्ज राहतो. १२ तास सतत कॉलिंग केले तरी डिव्हाईस सुरु ठेवता येते.

मायक्रोयुएसबीच्या कनेक्टरने फोन चार्ज करता येतो. फोनच्या वरच्या कडेला बिल्ट इन टॉर्च लाईट आहे. मेमरी मध्ये २ हजार नंबर , ५०० टेक्स्ट मेसेज सेव्ह होऊ शकतात. नोकिया १०५ हा जगात सर्वाधिक विक्री होणारा फिचर फोन असून संपूर्ण आफ्रिकेत तो लवकरच विक्री साठी उपलब्ध होत आहे.