व्हेलेंटाइन डे दिवशी होतोय पहिला तृतीयपंथी विवाह

या वर्षीचा व्हेलेंटाइन डे एका अनोख्या प्रेमाची साक्ष बनणार आहे. केरळ मध्ये या दिवशी मनु कार्तिक व श्यामा एस प्रभू हे दोघे तृतीयपंथी ट्रान्सजेन्डर श्रेणीमध्ये लग्न नोंदणी करणार आहेत. देशात या श्रेणीमध्ये विवाह नोंद होत असलेला हा पहिला विवाह आहे असे समजते.

भारतात तृतीयपंथी अधिकार विधेयक २०१४ व अधिनियम २०१९ नंतर अनेक तृतीयपंथी विवाह झाले आहेत मात्र त्यांची विवाह नोंदणी पुरुष आणि महिला याच श्रेणीमध्ये केली गेली आहे. मनु आणि श्यामा तृतीयपंथी श्रेणीखाली त्यांच्या विवाहाची नोंदणी करून या समुदायासाठी प्रेरणा बनणार आहेत. त्रिसून मध्ये राहणारा मनु मल्टीनॅशनल कंपनीत एचआर मध्ये काम करतो तर श्यामा तिरुवनंतपूर मध्ये केरळ सोशल जस्टीस विभागात ट्रान्सजेन्डर सेलची प्रमुख आहे.

मनु सांगतो, आमची दोघांची ओळख अनेक वर्षे आहे. चार वर्षापूर्वी त्याने श्यामाला प्रपोज केले पण तिच्यावर कौटुंबिक जबाबदारी असल्याने तिने प्रतिसाद दिला नव्हता. गेल्या वर्षी तिने माझे प्रपोजल स्वीकारले. तृतीयपंथीयांचे जीवन फार अवघड आहे. मनुच्या आईने त्याला शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले व त्यामुळेच आज तो चांगली नोकरी करू शकतो आहे. श्यामाने सुद्धा शिक्षणास प्राधान्य दिले. वास्तविक हे दोघे गेल्या वर्षी लग्न करणार होते पण करोना मुळे लॉकडाऊन लागला. या वर्षी हे विवाह करत आहेत. १४ फेब्रुवारीचा दिवस व्हेलेंटाइन डे म्हणून नाही तर चांगल्या मुहूर्ताचा दिवस म्हणून निवडल्याचा खुलासा या दोघांनी केला आहे.