या दुकानातून कुर्ता पायजमा साठी राजकीय नेत्यांची गर्दी

आज देशात पाच राज्याच्या विधानसभा मतदानाची सुरवात झाली आहे. देशात निवडणूक कुठेही असली तरी राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते दिल्लीच्या एका ४९ वर्षे जुन्या शिलाई दुकानात हेलपाटे मारतात आणि हे दुकान आहे उत्तर दिल्लीतील सिद्दिकी टेलर्स. सफेद किंवा रंगीत कुर्ता पायजमा शिवून घेण्यासाठी येथे राजकीय क्षेत्रातील लोकांची मोठी गर्दी होते आणि निवडणूक काळात ही गर्दी अमाप वाढते.

दुकानचे मालक जावेद सिद्दिकी सांगतात, उत्तर प्रदेश, पंजाब मधील अनेक नेते, कार्यकर्ते, नेत्यांचे परिवार येथे कुर्ता पायजमा शिवून घेण्यासाठी आवर्जून येतात. गेल्या दोन महिन्यांपासून इतक्या प्रचंड ऑर्डर आहेत कि रात्रंदिवस कामगार काम करत आहेत तरी महिनाभर वेटिंग आहे. हॅडलूम खादी, कॉटन सिल्क, लेनिन कापडाला अधिक पसंती आहे तर काही लोक पॉली कॉटनची मागणी करत आहेत.

दिल्लीत निवडणुका असतील तर श्वास घ्यायला फुरसत मिळत नाही असे सांगताना जावेद म्हणाले, त्यांचे वडील अयुब सिद्दिकी यांना माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसेन यांनी बोलावल्यावर ते १९६५ मध्ये दिल्लीत आले. त्यांनी डॉ. जाकीर हुसेन यांच्यासाठी शेरवानी शिवून दिली आणि ती त्यांना फार आवडली. मग डॉ. जाकीर हुसेन यांनी सिद्दिकी यांना राहायला जागा दिली.१९७३ मध्ये नॉर्थ दिल्ली अॅव्हेन्यू मध्ये हे दुकान सुरु केले. ४९ वर्षे झाली पण दुकानात ग्राहकांची गर्दी कायम असते. राजकीय नेते, लष्करी गणवेश, इतर नागरिक आवर्जून येथे येतात.