योगी, अखिलेश, प्रियांका यांच्या उत्साहाचे रहस्य

देशात आजपासून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या फेरीचे मतदान सुरु आहे. या निवडणुकात सर्व देशाचे लक्ष प्रामुख्याने उत्तर प्रदेशवर केंद्रित असून येथे योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी मॅरेथॉन प्रचारसभा घेत आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सतत धावपळ करूनही हे नेते उत्साही दिसत आहेत याचे कारण त्यांचे फिटनेस रुटीन. निवडणूक काळात सुद्धा हे नेते फिटनेसला महत्व देत आहेत. कशी आहे या नेत्यांची दिनचर्या याची खास माहिती अशी ,

योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी प्रथम खासदार झालेले योगी आज ४९ वर्षांचे आहेत. मात्र अजूनही अगदी फिट आहेत. त्यांचा दिवस पहाटे ३ वा. सुरु होतो. प्रथम तासभर योगासने, ध्यान, प्राणायाम केल्यावर ते संत असल्याने रोजची पूजा अर्चा करतात. सकाळी ८ वा. नाश्ता करताना अगदी हलका आहार, फळे ते घेतात. दुपारी दोन वाजता अगदी साधे जेवण आणि रात्री नऊ वाजता पुन्हा थोडेसे हलके काही तरी खातात. रात्री ११ वाजता त्यांचा दिवस संपतो.

अखिलेश ४८ वर्षांचे आहेत आणि दोन मुलांचे वडील आहेत. पण घरी आणि बाहेर दोन्हीकडे ते सारख्याच उत्साहाने वावरताना दिसतात. त्यांचा दिवस पहाटे ५ वा. सुरु होतो. अर्धा तास जॉगिंग, सायकलिंग केल्यावर सकाळी नाष्ट्यामध्ये ते फळे, भाज्या कधीतरी पास्ता घेतात. दही, दुध, ताक त्यांना प्रिय आहे. दुपारच्या जेवणात बटाटे आणि दही लागतेच. रोज सायंकाळी ते अर्धा तास टेनिस, फुटबॉल किंवा क्रिकेट खेळतात. निवडणूक काळात संध्याकाळी खेळणे बंद असते.

प्रियांका गांधी ५० वर्षांच्या आहेत. त्यांच्या दिवसाची सुरवात सुद्धा योगाने होते.त्यानंतर मॉर्निंग वॉक घेतात किंवा बाहेर पडणे जमले नाही तर घराच्या जिम मध्ये ट्रेड मिल वर चालतात. ब्रेकफास्ट साठी पोहे, कॉर्न फ्लेक्स त्यांना आवडतात. जेवणात भात, डाळ, रोटी, लिंबू पिळलेले सलाड, हिरव्या भाज्याना प्राधान्य असते तर रात्री इटालियन किंवा बिर्याणी घेणे त्या पसंत करतात. निवडणूक काळात मात्र सगळे नियम बाजूला ठेऊन त्या जेथे जे मिळेल ते खाणे पसंत करतात. भरपूर काम, मितआहार आणि योग्य व्यायाम हे या सर्व तरुण नेत्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे.