कार्लोस ब्रेथवेटने इडन गार्डन वरून ठेवले मुलीचे नाव

वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेटने रविवारी जन्मलेल्या त्याच्या नवजात मुलीचे नाव कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावरून ठेवले आहे. त्याची पत्नी जेसिकाने मुलीला जन्म दिल्यावर कार्लोसने मुलीसोबतचा एक फोटो शेअर करून तिच्या नावाचा खुलासा केला आहे.

या फोटोच्या कॅप्शन मध्ये कार्लोक्स लिहितो,’ रिमेम्बर द नेम, इडन रोझ ब्रेथवेट. जन्म ६ फेब्रुवारी २०२२. तुझ्यासारख्या सुंदर मुलीची मी मनापासून प्रतीक्षा करत होतो. तुझ्यावर मनापासून माया करेन हा वादा करतो. जेसिका, तू चांगली आई होशील याची खात्री आहे.’

कार्लोसने मुलीचे नाव इडन ठेवण्यामागे त्याच्या कोलकाताच्या या मैदानाशी असलेला खास संबंध कारणीभूत आहे. याच मैदानावर त्याने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बेन स्टोकला सलग चार षटकार मारून वेस्ट इंडीजला विश्वचषक मिळवून दिला होता. २०१६ मध्ये टी २० विश्वकप च्या अंतिम सामन्यात शेवटच्या सहा चेंडूत १९ रन्सचे आव्हान वेस्टइंडीज पुढे होते आणि इंग्लंडचे पारडे या सामन्यात जड होते. त्यावेळी कार्लोसने आपला करिष्मा दाखवत सलग चार षटकार फटकावून विजय मिळवून दिला. त्यावेळी कॉमेंटेटरने ‘रिमेम्बर द नेम, कार्लोस’ असा त्याचा गौरव केला होता.

सध्या कार्लोसचा फॉर्म फार चांगला नाही. ऑगस्ट २०१९ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तो संघाबाहेर आहे. पण आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन मध्ये पुन्हा चांगली संधी मिळेल अशी त्याची अपेक्षा आहे.