सचिन, धोनी, अझर, युवराज क्लब मध्ये येणार विराट कोहली
टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहली च्या करियर मध्ये आणखी एक मानाचा तुरा लवकरच खोवला जात आहे. विराटने भारतात ९९ वन डे सामने खेळले असून आता अहमदाबाद मध्ये वेस्ट इंडीज विरोधात मोदी स्टेडीयमवर विराट जेव्हा दुसरी वन डे खेळायला उतरेल तेव्हाच तो सचिन तेंडूलकर, धोनी, युवराज आणि अझरुद्दीन क्लब मध्ये सामील होणार आहे. विराटचा भारताच्या मैदानावरचा हा १०० वा सामना असेल.
विराट पूर्वी चार भारतीय खेळाडूंनी देशात १०० किंवा त्याहून अधिक वन डे खेळण्याचा पराक्रम केला आहे. स्वदेशात १०० वनडे खेळणाऱ्या खेळाडूत विराट जगात ३६ वा तर भारतात पाचवा खेळाडू असेल. सचिनने देशात सर्वाधिक १६४ वन डे खेळल्या आहेत. त्यापाठोपाठ धोनीने १२७, अझरूद्दीनने ११३ तर युवराज सिंगने १०८ वन डे खेळले आहेत.
विराटने स्वदेशातील ९९ वन डे खेळताना ५००२ धावा केल्या आहेत. मातृभूमीत सर्वात कमी डावात ५००० धावा करणारा विराट पहिला खेळाडू आहे. ९६ डावात ५००० धावा काढून त्याने सचिनचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.