राष्ट्रपती भवन येथील मुघल गार्डन १२ फेब्रुवारीपासून खुले

राजधानी दिल्लीतील सर्वात मोठे आणि राष्ट्रपती भवनचा एक भाग असलेले १५ एकर परिसरात तयार केलेले मुघल गार्डन १२ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले जात असून १६ मार्च पर्यंत ते खुले राहणार आहे. करोना मुळे या वर्षी एक आठवडा उशिरा ही बाग खुली झाली आहे. दरवर्षी १ फेब्रुवारीला सर्वसामान्य नागरिकांसाठी ती खुली केली जाते. गेल्या वर्षी सुद्धा करोना मुळे १३ फेब्रुवारीला ही बाग खुली केली गेली होती. या वर्षी सुद्धा १० वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षाच्या वरच्या नागरीकाना करोना नियमावली मुळे प्रवेश दिला जाणार नसून ज्यांना भेट द्यायची आहे त्यांनी एक आठवडा अगोदर ऑनलाईन बुकिंग करावयाचे आहे. दर सोमवारी हे उद्यान बंद राहणार आहे.

भारतीय आणि पाश्चिमात्य अश्या दोन्ही प्रकारे या उद्यानाची रचना केली गेली असून येथे विविध प्रकारची फुले, हर्बल गार्डन आहे. गुलाब, ट्युलिप आणि हर्बल गार्डन ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. या बागेत १३५ जातींचे गुलाब असून त्यात राणी एलिझाबेथ, मदर तेरेसा, ब्लॅक रोझ, ब्ल्यू मून, ग्रीन रोझ असे विविध गुलाब प्रकार आहेत. दरवर्षी अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक ही बाग बघायला मोठी गर्दी करतात.