मुकेश अंबानीनी एक दिवसात पुन्हा मिळविले आशियातील श्रीमंत स्थान

ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्स मध्ये ८ फेब्रुवारी रोजी रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत बनलेले अडानी ग्रुपचे गौतम अडानी यांना हे स्थान एका दिवसातच गमवावे लागले असून मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मंगळवारी रिलायंसच्या शेअर मध्ये तेजी आली तर दुसरीकडे अडानी ग्रुपच्या सात लिस्टेड कंपन्यांचे शेअर घसरले.

रिलायंस शेअर तेजीमुळे अंबानी यांची संपत्ती ८९.२ अब्ज डॉलर्स वर पोहोचली आणि ते जगातील श्रीमंत यादीत १० व्या स्थानावर आले. रिलायंस शेअर्स मध्ये १.६४ टक्के तेजी आल्याने अंबानी यांची संपत्ती १.३३ अब्ज डॉलर्सने वाढली. अर्थात या वर्षात अंबानी यांच्या नेटवर्थ मध्ये ७४.९ कोटींची घसरण झाली आहे.

दुसरीकडे मंगळवारी अडानी यांची संपत्ती २.१६ अब्ज डॉलर्सने घटून ८६.३ अब्ज डॉलर्सवर आली. ते आशियातील दुसरे आणि जगातील ११ वे श्रीमंत बनले. त्यांच्या ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर मध्ये ४.९३ टक्के, अडाणी ट्रान्समिशन २.३०, अडानी टोटल गॅस १.२३, अडानी एन्टरप्रायजेस १.२१ आणि अडानी पॉवर शेअर मध्ये ३.२७ टक्के घट झाली. फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गचे या यादीतील स्थान घसरून १४ वर गेले असून त्याची एकूण संपत्ती ८३.३ अब्ज डॉलर्सवर आली. एलोन मस्क या यादीत प्रथम स्थानी आहेत.