चंबळ रिव्हर फ्रंटवर जगातील सर्वात मोठी घंटा
राजस्थानच्या कोटा येथील ८०० कोटी रुपये खर्च करून बांधल्या जात असलेल्या चंबळ रिव्हर फ्रंटवर जगातील सर्वात मोठी घंटा बसविली जात आहे. ही घंटा पूर्ण तयार झाल्यावर तीन गिनीज रेकॉर्ड नोंदवेल असे समजते. एक तर ही जगातील सर्वात मोठी घंटा असेलच पण ती सिंगल कास्टिंग म्हणजे कुठेही जोड नसलेली असेल आणि तिचे एकूण वजन ८२ हजार किलो असणार आहे. या घंटेच्या आकृतीचे फ्लेक्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.
स्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले इंजिनीअर देवेंद्रकुमार आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते हरिराम कुंभावत यांच्या प्रयत्नातून या घंटेची निर्मिती सुरु आहे. देवेंद्रकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार घंटेचे वजन ५७ हजार किलो आहे पण ती अखंड राहावी आणि किमान ५ हजार वर्षे टिकावी यासाठी तिच्यावर ज्वेलरी (एक प्रकारचे डिझाईन) केले जात असून त्यामुळे घंटेचे एकूण वजन ८२ हजार किलोवर जाणार आहे. जगात सर्वात मोठी घंटा चीन मध्ये आहे मात्र ती विविध तुकडे बनवून जोडली गेली आहे आणि ती टांगली जात असताना एक तुकडा निखळला तो अजून बसविलेला नाही. दुसरी मोठी घंटा मास्को मध्ये आहे पण ती टांगली गेलेली नाही.
चंबळ रिव्हर फ्रंटवर बसविली जात असलेली घंटा जमिनीपासून ७० फुट उंचीवर टांगली जाणार आहे. घंटा कुणालाही वाजविता येईल आणि घंटानाद ८ किमी अंतरापर्यंत ऐकू जाणार आहे. घंटेचा आकार ८.५ गुणिले ९.२५ मीटर असा विशाल आहे. जेथे घंटेचा टोल आघात करणार आहे तो भाग अतिशय मजबूत बनविला गेला आहे. सिंगल पीस मध्ये बनत असलेली ही घंटा सोनेरी रंगाची आहे. याच रिव्हर फ्रंटवर चंबळ मातेची ४२ मीटर उंचीची संगमरवरी प्रतिमा उभी केली जाणार असून ती सर्वात मोठी संगमरवरी मूर्ती आहे. देशातील पहिले एलईडी गार्डन येथे बनत आहे आणि जगातील सर्वात मोठा नंदी येथे बसविला जाणार आहे.