जॉन्सन बेबी पावडरवर जगभरात बंदीची शक्यता

लहान मुले आणि महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या जॉन्सन टाल्क पावडरवर जगभरात बंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पावडरच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका असल्याचे दावे केले जात असून ब्रिटनच्या या कंपनीच्या शेअरधारकांनी एकत्र येऊन या पावडरच्या विक्रीवर वैश्विक प्रतिबंध घालावा यासाठी प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जॉन्सनच्या या उत्पादनावर कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी ३४ हजार दावे न्यायालयात दाखल केले गेले आहेत.

अमेरिकेत या पावडर मध्ये अॅस्बेस्टॉसचा एक प्रकारचा फायबर सापडला होता. या फायबर मुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यानंतर हजारो महिलांनी त्यांच्या मुलांना या पावडरमुळे कॅन्सर झाल्याचे आरोप करून कंपनीविरोधात दावे दाखल केले होते. त्यानंतर कंपनीने विक्री घटल्याचे कारण देऊन २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा मध्ये पावडर विक्री बंद केली होती. मात्र ब्रिटन सह जगात अन्य देशात आजही ही उत्पादने विकली जात आहेत. त्यामुळे ब्रिटन मधील शेअरधारकानी गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘ट्युलिप शेअर’ वर पावडर विक्री बंदी प्रस्ताव मांडला असून शेअरधारकांना त्यांचे शेअर्स जमा करण्याचे आवाहन केले गेले आहे. आवश्यक संखेने शेअर जमा झाल्यावर अमेरिकन स्टॉक मार्केट नियामक एजन्सीकडे हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

एप्रिल मध्ये जॉन्सन कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्यात हा प्रस्ताव सादर होईल असे सांगितले जात आहे. या पूर्वी कंपनीला त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या २२ याचिकात २०० कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागला होता. त्यानंतर कंपनीने पावडर विभाग वेगळी शाखा आणि वेगळी कंपनी काढून ती दिवाळखोर झाल्याचे जाहीर केले होते. मात्र कंपनी आजही पावडर विक्री करून लाखोंचा नफा कमावत असल्याचे आरोप केले जात आहेत.