लतादिदिसाठी राष्ट्रीय शोक, अशी आहे नियमावली

सुरसम्राज्ञी लतादीदी यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला गेला असून सर्व देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविले गेले आहेत. वास्तविक दीदी कोणत्याही सरकारी पदावर नव्हत्या किंवा सरकारशी संबंधित नव्हत्या तरीही राष्ट्रीय शोक जाहीर केला गेला असून त्यासाठी काय खास नियमावली आहे याची माहिती करून घेणे उचित होईल.

राष्ट्रीय शोक जाहीर करून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविणे यासाठी काही खास पदांची यादी असून त्यासाठी घटनेमध्ये नियम आहेत. मात्र या पदांशिवाय अन्य कुणा व्यक्तीसाठी असा शोक जाहीर करायचा असेल तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. लता दीदी भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होत्या आणि त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय शोक जाहीर करण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला असे समजते.

राष्ट्रीय शोक जाहीर झाल्यावर केवळ देशातच नाही तर परदेशात जेथे जेथे आपले दूतावास आहेत तेथेही राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविला जातो. यात प्रथम ध्वज पूर्ण वर नेऊन मग हळूहळू निम्म्यावर खाली आणला जातो. या काळात मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार होतात आणि पार्थिव तिरंग्यात लपेटले जाते. अंत्यसंस्कारवेळी बंदुकांची सलामी दिली जाते आणि सार्वजनिक सुटी जाहीर केली जाते. पूर्वी फक्त केंद्राच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती घोषणा करत असत पण आता नियम बदलले असून राज्यानाही कुणाला हा राष्ट्रीय सन्मान द्यायचा याचे अधिकार दिले गेले आहेत. तसेच या काळात सार्वजनिक सुट्टी दिलीच पाहिजे असे बंधन आत्ता नाही.

मात्र पंतप्रधान पदावर असताना किंवा राष्ट्रपती पदावर असताना त्या व्यक्तीचे निधन झाले तर सार्वजनिक सुट्टी देण्याचे बंधन आहे. अश्या सन्मान्य व्यक्तींचे २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर अश्या दिवशी निधन झाले तर राष्ट्रीय शोक जाहीर झाला तरी सर्व देशातील राष्ट्रीय ध्वज अर्थ्यावर उतरविले जात नाहीत तर ज्या इमारतीत संबंधित व्यक्तीचे पार्थिव ठेवले असेल त्या इमारतीवरचा ध्वज अर्ध्यावर उतरविला जातो.