ब्रिटनची पुढची राणी होणार कॅमिला, महाराणीने केली घोषणा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांच्या राज्याभिषेकाला ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक घोषणा केली असून त्यात प्रिन्स चार्ल्स राजा बनल्यावर त्यांची पत्नी कॅमिला महाराणी बनेल असे जाहीर केले आहे. कॅमिला सध्या डचेस ऑफ कॉर्नवॉल आहेत. महाराणीच्या या घोषणेवर ब्रिटीश नागरिकांनी मात्र नापसंती व्यक्त केली असून सोशल मिडीयावर या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयावर ब्रिटीश नागरिकांनी दिवंगत प्रिन्सेस डायनाची आठवण काढताना भविष्यात कॅमिला क्वीन कंसोर्ट म्हणूनच राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कॅमिलाचे आयुष्य अनेक वादविवादानी भरलेले असल्याने अश्या प्रतिक्रिया आल्याचे सांगितले जात आहे.

कॅमिलावर डायना आणि चार्ल्स यांच्या घटस्फोटास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जातो. घटस्फोट झाल्यावर लगेचच डायनाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. प्रिन्सेस डायनाने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत १९९५ मध्ये हैराण करणारे दावे केले होते. या मुलाखतीत आमच्या लग्नसंबंधात आम्ही तिघे आहोत असेही वक्तव्य केले गेले होते. डायना आणि चार्ल्स यांच्या विवाहापूर्वी सुद्धा चार्ल्स आणि कॅमिला यांच्यात खास मैत्री होती असे सांगितले जात होते. मात्र डायनाच्या मृत्युनंतर प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांनी त्यांचे प्रेम जगासमोर कबूल केले होते.

कॅमिला यांच्या जन्म १९४७ चा असून त्यांचे शिक्षण स्वित्झर्लंड, फ्रांस आणि लंडन मध्ये झाले आहे. त्या श्रीमंत घराण्यातील आहेत आणि १९७० मध्ये प्रथम प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला एका पोलो सामन्याच्या निमित्ताने प्रथम भेटले होते त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत होती पण प्रिन्स चार्ल्स यांनी कधीच कॅमिला यांना प्रपोज केले नाही. त्यामुळे १९७३ मध्न्ये कॅमिला यांनी एका सेना अधिकाऱ्याशी विवाह केला आणि त्यांना दोन मुले झाली. मात्र कॅमिला यांच्या विवाहानंतर सुद्धा त्यांची प्रिन्स चार्ल्स यांच्याशी जवळीक होती असे सांगतात. १९८१ मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि डायना विवाह झाला. कॅमिला यांनी पतीपासून १९९५ मध्ये घटस्फोट घेतला होता तर प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांनी १९९६ मध्ये घटस्फोट घेतला आणि त्यानंतर १९९७ मध्ये डायना कार अपघातात मृत्यू पावली.

प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला १९९६ पासून एकत्र राहत होते पण त्यांनी त्यांचे नाते १९९९ मध्ये सार्वजनिक केले होते. २००५ मध्ये त्यांनी रीतसर विवाह केला. कॅमिला यांचा स्वीकार शाही परिवाराने केला आणि प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यांनीही कॅमिला यांनी त्यांच्या वडिलांना आनंदात ठेवल्याचे मान्य केले आहे.