अंबानी मागे, अडानी बनले आशियातील सर्वाधिक श्रीमंत

अडानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अडानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून त्यांनी रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळविले आहे. ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्स मध्ये ५९ वर्षीय गौतम अडानी यांची संपत्ती ८८.५ अब्ज डॉलर्सवर गेली असल्याचे नमूद केले गेले असून मुकेश अंबानी यांची संपत्ती ८७.९ अब्ज डॉलर्स आहे. फोर्ब्स लिस्ट मध्ये अडाणी अगोदरच मुकेश अंबानी यांच्या पुढे आहेत. गौतम अडानी जगातील धनकुबेर यादीत १० व्या क्रमांकावर असून अंबानी ११ व्या स्थानी आहेत.

या वर्षीच्या कमाई मध्ये अडानी सर्वाना भारी पडले आहेत. त्यांची संपत्ती १२ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती २.०७ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. गौतम अडानी यांनी व्यवसायाची सुरवात कमोडीटी ट्रेडिंग पासून केली होती आणि आज त्यांचे पोर्टस, खाणी, ग्रीन एनर्जी असे अनेक क्षेत्रात व्यवसाय आहेत. त्यांच्या काही कंपन्यांच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षात ६०० टक्के वाढ नोंदविली आहे.

गेल्या तीन वर्षात अडानी ग्रुप कडे ७ विमानतळांचे संचालन आले असून अडानी ग्रुप देशातील सर्वात मोठा एअर ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि सिटी गॅस रिटेलर बनला आहे. ब्लुमबर्गच्या या यादीत पहिल्या क्रमांकावर टेस्लाचे एलोन मस्क, दोन नंबरवर ब्लू ओरिजिनचे जेफ बेजोस, तीन नंबरबर फ्रांसचे बर्नार्ड आरनोल्ड आणि चार नंबरवर बिल गेट्स आहेत.