काश्मीर घ्या आणि लता द्या- ऑल इंडिया रेडीओ कडे आले होते पत्र

महान गायिका आणि लाखो हृदयांना आपल्या सुमधुर आवाजाने शांती देणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणीना उजाळा दिला जात आहे. असे सांगितले जाते कि पाकिस्तान आणि भारत एकमेकांचे कट्टर शत्रू असले आणि दोन्ही देशांचे कोणत्याच गोष्टीवर कधी एकमत झालेले नसले तरी एक गोष्ट दोन्ही देश एकदिलाने मान्य करत आणि तो म्हणजे लातादिदींचा स्वर्गीय सूर. अनेक बडे कलाकार आजपर्यंत जन्माला आले, येतील पण लता सर्वांहून वेगळी. लतादीदींच्या कंठात सरस्वती विराजमान आहे याविषयी कुणाला शंका नव्हती.

फाळणी नंतर पाकिस्तान वेगळे झाले तरी तेथे लतादीदींच्या गाण्यांचे चाहते खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि आहेत. त्या काळात ऑल इंडिया रेडीओ कडे एक पत्र आले होते. त्यात हिंदुस्थानला काश्मीर द्या आणि त्याबदली लता पाकिस्तानला द्या असे सुचविले गेले होते. पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका नूरजहान सुद्धा म्हणत असत, ‘लता माझे कौतुक करते पण खरे तर तीच एकमेव आहे. लतासारखे अजून कुणी जन्माला आलेले नाही.’

लतादीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसत त्याविषयी एकदा विचारले असता त्या म्हणाल्या,’ लहानपणापासून मला पांढरा रंग आवडतो. लहानपणी माझे परकर पोलके सुद्धा पांढरे असायचे. मध्ये कधीतरी रंगीत साडी नेसले होते, हिरव्या रंगाची. पण तेव्हा वाटले, या आवडीला अंत नाही. आज हिरवा आवडतो, उद्या पिवळा, परवा लाल आवडेल. त्या पेक्षा पांढरा रंग सर्वात उत्तम.’ लता दीदीना डोक्यात फुले माळायची आवड होती पण त्या फुले सुद्धा पांढऱ्या रंगाची निवडत असत.