सुरु झाला प्रेमाचा सप्ताह, आज रोझ डे
नवी पिढी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते तो प्रेमाचा सप्ताह आजपासून सुरु होत आहे. ७ फेब्रुवरी ते १४ फेब्रुवारी पर्यंत जगात बहुतेक ठिकाणी व्हेलेंटाइन विक साजरा केला जातो. त्यातील आजचा पहिला दिवस ‘रोझ डे’ म्हणून साजरा होत आहे. आजच्या या सोहळ्यासाठी बाजार लाल, पिवळे, पांढरे, नारिंगी, गुलाबी रंगांच्या गुलाबांनी दरवळत आहेत. आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा हा खास दिवस मानला जातो. गुलाब भावना दर्शविणारे फुल आहे.
असे सांगतात कि मोगल बेगम नूरजहा हिला लाल गुलाब फार प्रिय होते आणि त्यामुळे बादशहा तिला दररोज शेकडो किलो लाल गुलाब पाठवीत असे. महाराणी व्हिक्टोरियाच्या वेळी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवघेव करण्याची प्रथा आणि परंपरा होती. व्हिक्टोरियन व रोमन प्रेमाची भावना गुलाब देऊन व्यक्त करत असत. यात गुलाबाचा रंग कोणता यालाही फार महत्व होते.
लाल गुलाब हे प्रेम, पॅशन व इमोशनचे प्रतिक मानतात तर पिवळा गुलाब दोस्ती, आनंद आणि चांगले आरोग्य कामना यांचे प्रतिक आहे. पांढरा गुलाब भांडण झाले असेल तर ते सर्व विसरून पुन्हा नव्याने नाते जोडण्याचे आणि शांतीचे प्रतिक मानले जाते. गुलाबी गुलाब धन्यवाद दर्शविणारे प्रतिक असून रोझ डे दिवशी आपल्या माता पित्याला गुलाबी गुलाब दिला जातो.
ऑरेंज रंगाचा गुलाब हे उत्साह, जोडप्याच्या प्रेमातील जोश यांचे प्रतिक मानला जातो. हा सप्ताह रोमन संत व्हेलेंटाइन यांच्या नावाने साजरा होतो. जगभरात सर्वत्र प्रेमाची भावना असावी अशी त्यांची इच्छा होती. या आठवड्यात ७ फेब्रुवारी हा रोझ डे असतो. त्यानंतर ८ फेब्रुवारी प्रपोज डे, ९ फेब्रुवारी चॉकलेट डे, १० फेब्रुवारी टेडी डे, ११ फेब्रुवारी प्रॉमिस डे, १२ फेब्रुवारी हग डे, १३ फेब्रुवारी कीस डे तर १४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डे म्हणून साजरे होतात.