लतादिदींनी नाकारले होते खासदार वेतन आणि घर

लतादीदी यांनी केवळ गाण्यातूनच नाही तर राज्यसभेच्या खासदार म्हणूनही देशसेवा केली आहे. त्या १९९९ ते २००५ या काळात राज्यसभेच्या मानद खासदार होत्या. या सहा वर्षाच्या काळात त्यांनी खासदारांना दिले जाणारे वेतन कधीच घेतले नाही. त्यांच्याकडे वेतनाचा चेक पाठविला जात असे पण त्या दरवेळी तो परत पाठवत असत असे समजते. इतकेच नव्हे तर दिल्ली मध्ये त्यांना खासदार बंगला दिला जात होता तो सुद्धा त्यांनी नाकारला होता. एका कार्यकर्त्याने माहिती अधिकार हक्क खाली केलेल्या अर्जाला दिल्या गेलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

लता दिदींनी खासदारांना देण्यात येणारी पेन्शन सुद्धा नाकारली होती. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेही त्याला राज्यसभेचे मानद खासदार झाल्यावर मिळालेले ९० लाखांचे सर्व वेतन पंतप्रधान निधी मध्ये दान दिले होते. लता दीदी त्यांच्या अखेरच्या दिवसात म्हणजे व्हेंटीलेटर वर असताना कानाला हेडफोन लावून त्यांचे वडील मास्टर दिनानाथ यांची गाणी ऐकत होत्या. त्या स्वतः गायलेली गाणी फारशी ऐकत नसत कारण त्यात त्या गाताना काय चुकले याचाच जास्त विचार करत असेही सांगतात. मात्र वडिलांवर त्यांची नितांत श्रद्धा होती कारण तेच त्यांचे पहिले गुरु होते.