प्रिन्स विलियम्स यांनी घरात बांधली पॅनिक रूम आणि गुप्त भुयार

तिसरे महायुध्द झालेच तर ते जैविक शस्त्रांनी लढले जाईल असे म्हटले जाते. ब्रिटनचे ड्युक व डचेस ऑफ केम्ब्रिज म्हणजे प्रिन्स विलियम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडलटन यांनी त्यांच्या परिवाराची सुरक्षा लक्षात घेऊन केसिंग्टन पॅलेस मध्ये पॅनिक रूम आणि गुप्त भुयार बांधून घेतल्याची बातमी डेली स्टारने दिली आहे.

या बातमीनुसार प्रिन्स विलियम यांचे कुटुंब जेथे वास्तव्य करते त्या केसिंग्टन पॅलेसमध्ये पॅनिक रूम, एक एस्केप टनेल, एअर फिल्टरेशन सिस्टीम सह बांधला गेला आहे. विलियम लहान असताना आई डायना आणि छोटा भाऊ हेन्री यांच्या सह महालातून बाहेर पडून मॅकडोनाल्ड मध्ये जाण्यासाठी गुप्त भुयाराचा वापर करत असत. प्रिन्स विलियम ब्रिटीश राजघराण्याचे दोन नंबरचे राजगादी वारस आहेत त्यामुळे त्यांची आणि त्यांचा राजगादीचा तीन नंबरचा वारस असलेला मुलगा प्रिन्स जॉर्ज यांची सुरक्षा फार महत्वाची मानली जाते.

प्रिन्स विलियम्स यांच्या केम्ब्रिज मधील हवेली मध्ये सुद्धा पॅनिक रूम आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या महालात दोन पॅनिक रूम्स असून त्यातील एक विंडसर महालात तर दुसरी बकिंघम पॅलेस मध्ये आहे. १५ वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या रूम्स १८ इंची जाड, बुलेट प्रुफ, अग्नीविरोधी स्टीलच्या आहेत. विषारी वायू, दहशतवादी हल्ला झाला तरी महाराणी सुरक्षित राहाव्या असे या रूम्सचे डिझाईन आहे.

पॅनिक रूम बॉम्ब हल्ला झाला तरी सुरक्षित राहतात आणि त्यात कपडे, बाकीच्या आवश्यक गरजेचे सामान, भोजन पाणी एक आठवडा भर पुरेल अश्या प्रकारे त्या सज्ज असतात. हवाई हल्ल्यात सुद्धा या रूम्स सुरक्षित राहतात असे समजते.