स्टार फलंदाज सूर्यकुमारचे नवे खेळणे  ‘निस्सान जोंगा’

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन कडून खेळणारा सूर्यकुमार यादव हा निस्सानच्या जोंगा चा अभिमानी मालक बनला असून त्याने सोशल मिडीयावर त्याच्या या नव्या वाहनाचे फोटो शेअर केले आहेत. क्रीडा क्षेत्रात महेंद्रसिंग धोनी नंतर सूर्यकुमार, जोंगा खरेदी करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. आजकाल उद्योजक आणि बॉलीवूड सेलेब्रिटी नंतर स्पोर्ट्समनच्या कार क्रेझची चर्चा वारंवार होताना दिसते आहे. सूर्यकुमार याला सुद्धा कार्सची क्रेझ आहे आणि त्याच्या ताफ्यात एकापेक्षा एक अलिशान कार्स सामील आहेत. आता त्याने स्पेशल कस्टमाईज, ऑफ रोडिंग, एसयूव्ही निस्सान जोंगाची खरेदी केली असून कधीकाळी ही जोंगा भारतीय सेनेची शान होती.

महेंद्रसिंग धोनी यानेही पूर्वी अशीच निस्सान जोंगा खरेदी केली आहे. सूर्यकुमारने त्याच्या फ्लुरोसंट हिरव्या रंगाच्या जोन्गाचे फोटो शेअर करताना लिहिले आहे,’ माझे खास खेळणे, ‘हल्क’, हॅलो करा.’ सूर्याची ही गाडी खूपच कस्टमाईज केली गेली आहे.

निस्सानने १९६५ मध्ये भारतीय सेनेसाठी खास परवाना जारी करून या जोंगा बनविल्या होत्या. या ऑफरोडर, पॉवरफुल एसयूव्ही १९६९ ते १९९९ पर्यंत भारतीय लष्कराचे मुख्य वाहन होत्या. नंतर त्यांच्या जागी महिंद्राच्या एमएम ५४० जीप्स आल्या. सिविल विक्रीसाठी फक्त १०० जोंगा बनविल्या गेल्या होत्या आणि भारतातील काही निवडक लोकांकडे या जोंगा होत्या. त्यात आता धोनी आणि सूर्यकुमारची भर पडली आहे. १ टन वजनी या गाडीला कस्टमाइज केल्यावर तिची किंमत खूप वाढते असे समजते.

जोंगा साठी ३.९ लिटरचे, सहा सिलिंडर डीझेल इंजिन असून तीन स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्स आणि फोर व्हील ड्राईव्ह आहे. सूर्यकुमारच्या संग्रही रेंज रोव्हर वेलर, मिनी कुपर एस, ऑडी आरएस ५, स्कोडा अश्या अनेक कार्स आहेत.