बेजोसच्या अलिशान याचसाठी १४४ वर्षे जुना पूल तोडला जाणार

जगातील दोन नंबरचे श्रीमंत आणि अमेझोन व ब्लू ओरिजिनचे मालक जेफ बेजोस यांच्या अलिशान लाईफस्टाईलच्या बातम्या नेहमीच वाचनात येत असतात. आता त्यांच्या एका अलिशान सुपरयाचचा मार्ग सुकर करण्यासाठी नेदरलंड मधील एक प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचा आणि जागतिक वारसा यादीत समावेश केलेला पूल तोडला जाणार आहे. हा पूल १८७८ साली बांधला गेला होता म्हणजे तो १४४ वर्षे जुना आहे आणि २०१७ मध्येच त्याची मरम्मत केली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेफ बेजोस यांच्या अलिशान याचची निर्मिती नेदरलंडच्या ओसियान्को कंपनीने केली आहे. ४८५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे हे याच ४१७ फुट लांब आणि १३० फुट उंचीचे आहे. या याचचे कोडनेम वाय ७२१ असल्याचे समजते. हे याच समुद्रात नेण्यासाठी  एकमेव मार्ग असून त्याच मार्गावर रोटरडॅम शहरात हा प्राचीन पूल आहे. या पुलाची उंची कमी असल्याने त्याखालून याच न्यायचे असेल तर पूल तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या संदर्भातील बातम्या मिडिया मध्ये येऊ लागल्यावर या पुलाचा काही भाग तात्पुरता तोडला जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

सरकारच्या या निर्णयावर सोशल मिडियामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.२०१४ आणि २०१७ मध्ये या पुलाची डागडुजी झाल्यानंतर तो पुन्हा तोडला जाणार नाही असे सरकारने जाहीर केले होते. मात्र आता रोटरडॅम मेयरचे प्रवक्ते पूल तोडण्याचा आणि तो पूर्ववत करून देण्याचा खर्च बेजोस करणार असल्याचे सांगत आहेत. या पुलाचा हिटलरशी संबंध आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मन विमानांनी या पुलावर तुफान बॉम्बफेक केली होती.