फेसबुकला झटका, वेगाने कमी होतेय युजर्स संख्या

फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने १८ वर्षात प्रथमच फेसबुकला मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचे जाहीर केले असून फेसबुक युजर्सची संख्या सातत्याने कमी होत चालल्याने जाहिरात व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. मेटा कडून ही घोषणा येताच फेसबुकच्या शेअरमध्ये २२ टक्के घसरण नोंदविली गेली आहे.

मेटा कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार गेल्या तिमाहीत दररोज १० लाख सक्रिय युजर्स कमी होत आहेत त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. कंपनीचे बाजारमूल्य त्यामुळे २०० अब्ज डॉलर्सनी कमी झाले आहे. गेल्या तिमाहीत वास्तविक कंपनीला १.९५ अब्ज सक्रीय युजर्सची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात ही संख्या १.९३ अब्जावर थांबली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने १०.३ अब्ज डॉलर्सचा नफा मिळविला असला तरी हे प्रमाण गतवर्षीच्या याच काळापेक्षा ८ टक्के कमी आहे.

फेसबुकला हे नुकसान अॅपल मुळे सोसावे लागल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी अॅपलने प्रायव्हसी फिचर जारी केले त्यामुळे कोणतेच दुसरे अॅप, युजर परवानगी शिवाय फोन एक्सेस करू शकत नाही. या फिचर मुळे आयफोन युजर्सना त्यांच्या डेटावर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे फेसबुक ट्रॅक करू शकत नाही. याचा थेट फटका फेसबुक जाहिरात व्यवसायाला बसला आहे. त्यातच फेसबुकला युट्यूब आणि टिकटॉकचे तगडे आव्हान पेलावे लागत आहे. परिणामी पुढच्या तिमाहीत कंपनीचा महसूल आणखी घटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. फेसबुकच्या २०२१ च्या चौथ्या तिमाहीत जागतिक युजर्सची संख्या ५ लाखाने कमी झाली असून २००४ मध्ये कंपनी स्थापन झाल्यानंतर प्रथमच इतकी मोठी गिरावट नोंदली गेली आहे.