फरहान अख्तर आणि शिबानीला २१ फेब्रुवारीला लग्नबेडी

बॉलीवूड मधील नावाजलेला दिग्दर्शक आणि गुणी अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या प्रेमाची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली असून फरहानचे वडील जावेद अख्तर यांनीच फरहान आणि शिबानी लग्नबेडीत अडकत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जावेद यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत फरहान आणि शिबानी २१ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले आहे. फरहानने मात्र अजून याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

जावेद यांच्या म्हणण्यानुसार फरहान आणि शिबानी यांचा विवाह खंडाळ्यातील घरात अगदी साधेपणाने आणि मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत होणार असून वेडिंग प्लॅनर त्याची तयारी करत आहेत. करोना नियम लक्षात घेऊन अगदी कमी लोकांना निमंत्रण दिले जात असून निमंत्रण पत्रिका अजून दिल्या गेलेल्या नाहीत. जावेद म्हणाले शिबानी चांगली मुलगी आहे आणि तिचे कुटुंबीय सुद्धा मला आवडतात.

फरहानचा हा दुसरा विवाह आहे. त्याचा पहिला विवाह हेअरस्टायलिस्ट अधुना भवानी हिच्याबरोबर झाला होता. २०१७ मध्ये ते विभक्त झाले असून या जोडप्याला दोन मुली आहेत. फरहानच्या नुकत्याच आलेल्या तुफान चित्रपटाला संमिश्र यश मिळाले होते. आता त्याचा ‘जी ले जरा’ हा आगामी चित्रपट येत असून त्यात प्रियांका चोप्रा, अलीया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका आहेत.