नासा २०३१ मध्ये देणार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जलसमाधी

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे संचालन २०३० अखेर करणार असून नंतर २०३१ च्या जानेवारी मध्ये या स्टेशनला प्रशांत महासागरातील दूरच्या आणि ‘पॉइंट निमो’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जागेत जलसमाधी दिली जाणार आहे असे समजते. भविष्याची रूपरेषा तयार करणाऱ्या नव्या योजनेत हा खुलासा नासाने केला आहे. १९९८ मध्ये, फुटबॉलच्या आकाराचे हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ४२० किमी अंतरावर अंतराळात स्थापन केले गेले होते आणि आजही ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते आहे.

या स्थानकावर १९ देशांच्या २०० अंतराळवीरांनी संशोधन अथवा अन्य मिशनसाठी वास्तव्य केले आहे. येथे सतत मानव उपस्थिती आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार आता व्यावसायिक पद्धतीने संचालित स्पेस प्लॅटफॉर्म, वैज्ञानिक संशोधनासाठी अंतराळ स्थानकाची जागा घेतील. खासगी क्षेत्राच्या मदतीने नासा तंत्रज्ञान व आर्थिक रुपात मदत करून कमर्शियल लो अर्थ ओर्बिट डेस्टीनेशन विकसीत करत आहेत. असे प्लॅटफॉर्म कमी खर्चाचे, विश्वसनीय, सुरक्षित असतील असा दावा केला जात आहे. त्यासाठी नासा खासगी क्षेत्राबरोबर त्यांचा अनुभव शेअर करणार आहे.