रामदेवबाबांच्या पतंजलीने आणली क्रेडीट कार्ड

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने क्रेडीट कार्ड जारी केली असून सरकारी क्षेत्रातील दोन नंबरची पंजाब नॅशनल बँक आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यासोबत त्यासाठी सहकार्य करार केला आहे. या दोन्ही संस्थांसह पतंजलीचे को ब्रांडेड क्रेडीट कार्ड लाँच केले गेले आहे. ही कार्ड रु पे प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. विजा आणि मास्टर कार्ड प्लॅटफॉर्मवर सुद्धा क्रेडीट कार्ड जारी करता येतात पण पतंजलीने त्यासाठी स्वदेशी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिल्याचे समजते. म्हणून पतंजलीने पेमेंट गेटवे या देशी कंपनी एनपीसीआयची निवड केली आहे.

पतंजली क्रेडीट कार्ड दोन व्हेरीयंट मध्ये आहेत. पीएनबी रूपे प्लॅटीनम आणि पीएनबी रूपे सिलेक्ट असे हे दोन व्हेरीयंट असून अन्य क्रेडीट कार्ड प्रमाणे कॅशबॅक, लोयल्टी पॉइंट, इन्शुरन्स कव्हर सह अनेक फायदे ग्राहकाला मिळणार आहेत. खरेदी, ऑनलाईन शॉपिंग, रोख काढणे अशी सर्व कामे यावर करता येतील आणि शिवाय पतंजली स्टोर मधून खरेदी केल्यास विशेष फायदे मिळणार आहेत. कार्ड लाँच झाल्याच्या तीन महिन्याच्या आत कार्ड घेतले तर पतंजली माल खरेदीवर २ टक्के सूट मिळेल पण त्यासाठी २५०० रु.ची खरेदी करावी लागेल.

सिलेक्ट व्हेरीयंट वर विमानतळावर लाउंज अॅक्सेस मिळणार असून अॅड ऑन कार्ड सुविधा आहे. विमा कव्हर मोफत असून अपघाती मृत्यू साठी २ लाखाचे विमा कव्हर आहे. असे समजते. प्लॅटीनम कार्डवर क्रेडीट मर्यादा २५ हजार ते ५ लाख तर सिलेक्टवर ५० हजार ते १० लाख अशी आहे.