आयपीएल मध्ये हा असेल २० कोटीचा खेळाडू, आकाश चोप्राने दिले संकेत

आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन बंगलोर येथे १२, १३ फेब्रुवारी रोजी होत असून यंदा १० टीम्स अनेक खेळाडूंचे भविष्य ठरविणार आहेत. यात सर्वात महाग खेळाडू कोण असेल याचे तर्क वितर्क सुरु झाले असतानाचा टीम इंडियाचा माजी गोलंदाज आकाश चोप्रा याने युट्यूब चॅनलवर खेळाडूचे नाव सांगितले आहे. त्याने दिलेल्या संकेतानुसार श्रेयस अय्यर हा यंदाचा सर्वात महागडा खेळाडू असेल आणि त्याच्यासाठी २० कोटींची बोली लागेल. आकाशच्या म्हणण्यानुसार श्रेयस केकेआर किंवा आरसीबीचा कप्तान बनू शकेल. मार्की प्लेअर लिस्ट मध्ये ईशान किशन नाही त्यामुळे श्रेयस हाच महाग खेळाडू असेल. अय्यर साठी भरपूर पैसा खर्च करून ईशान साठी रिझर्व ठेवले जातील.

आकाशच्या म्हणण्यानुसार आरसीबी बंगलोर ने श्रेयस साठी २० कोटी रुपये वेगळे ठेवले आहेत. श्रेयसची आयपीएल मधील कामगिरी उत्तम आहे. त्याने ८७ सामन्यात ३१.६६ च्या सरासरीने २३७५ धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्स साठी कप्तानी केली आहे मात्र या सिझन पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने श्रेयसला रिलीज केले आहे. यंदाच्या मार्की प्लेअर लिस्ट मध्ये १० खेळाडू असून त्यातील सहा विदेशी तर चार भारतीय आहेत. त्यात रवीचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, पॅट कमिन्स, क्लिंटन डी कॉक्स, शिखर धवन, फाफ दुप्लेसी, श्रेयस अय्यर, कॅगीसो रबाडा, मोहम्मद शमी व डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे.