या ठिकाणी होतोय काळा बर्फवर्षाव
थंडीच्या दिवसात अनेक जागी हिमपात किंवा बर्फवर्षाव होतो आणि त्याच्या बातम्या येत राहतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर घेतलेली घरे, झाडे, मैदाने याचे फोटो, व्हिडीओ मोठ्या संखेने पाहायला मिळतात. बर्फ पडतानाचा अनुभव वेगळाच असतो मात्र रशियाच्या सायबेरिया भागातील नागरिकांना बर्फपात मोठे संकट वाटतो आहे. कारण या भागात काळा बर्फवर्षाव होतो असून या विचित्र हिमपाताचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
काही नागरिकांनी हा प्रदूषणाचा फटका असल्याचे सांगताना राख आणि काळ्या बर्फाने वेढलेल्या मैदानातच मुलांना खेळावे लागत असल्याचे नमूद केले आहे. कोळसा प्रदूषणामुळे हा प्रकार घडतो आहे. या भागात भयानक थंडी पडते आणि त्यामुळे उष्णता मिळावी म्हणून कोळसा जाळून गरम पाण्याचे प्रकल्प येथे चालविले जातात. कोळशाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणवर धूळ उडते त्यामुळे प्रदूषण वाढले आहे.
ओम्सुचन गावाचा एक व्हिडीओ या बाबत बोलका ठरला आहे. सोविएत युनियन भंग पावल्यावर अजूनही परिस्थितीत काही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच गरम पाणी प्लांट घरे उबदार ठेवण्याचे स्त्रोत आहेत. येथे सोने आणि कोळशाच्या खाणी आहेत. जानेवारी मध्ये येथील तापमान उणे ५० अंश असून मोठ्या प्रमाणावर कोळसा जाळण्याशिवाय अन्य पर्याय नाही. यामुळे हवेत धूळ, राख भरून राहते आणि बर्फासोबत जमिनीवर येते असे समजते.