बाईक रायडर्ससाठी आली एअरबॅग जीन्स

वाहन कोणतेही असो, वेगाची झिंग काही वेगळीच. मग त्यात स्पोर्ट्स कार्स किंवा दणकट बाइक्स हाती असतील तर मग बघायलाच नको. पण वेगाची ही क्रेझ अनेकदा अपघातांना निमंत्रण देते. आजकाल कार्स मध्ये एअरबॅग्स आल्याने कारचालकांना बऱ्यापैकी सुरक्षा मिळू शकते पण भन्नाट वेगाने बाईक चालविणाऱ्याना हा अनुभव कितीही थ्रिलिंग वाटला तरी हे थ्रील कधी जीवावर बेतेल याचा नेम नसतो. पण आता बाईक चालकांसाठी सुद्धा एका स्वीडिश कंपनीने एक खास एअरबॅग जीन्स विकसित केली असून याच वर्षी ती प्रथम स्वीडनच्या बाजारात उपलब्ध केली जात आहे.

सर्वसामान्य पँट प्रमाणे ही एअरबॅग जीन्स घालता येते. कार ड्राईव्ह प्रमाणे बाईक ड्रायविंग करताना अपघात झाल्यास बाईक चालकाचा मृत्यू होण्याचे प्रमाण २८ टक्के जास्त असल्याचे आकडेवारी सांगते. दुचाकी वेगात असताना तिचा रस्त्यावर तोल सांभाळणे अवघड जाते. अर्थात यासाठीच बाईक सेफ्टी गिअर्स आवश्यक असतात. म्हणजे हेल्मेट, जॅकेट, नेक गिअर, ग्लोव्हज, नी कव्हर वगैरे. मात्र ते पुरेसे ठरत नाहीत असे अनेकदा दिसते. यासाठीच या कंपनीने एअरबॅग जीन्स तयार केली आहे. २०१६ पासून त्यावर काम सुरु होते आणि २०२१ मध्ये व्यावसायिक स्वरुपात ही जीन्स विकसित करून त्याचे पेटंट घेतले गेले आहे.२०२१ मध्ये याची क्रॅश टेस्ट यशस्वी झाल्यावर तिच्या उत्पादनाला मंजुरी दिली गेली आहे.

ही एअरबॅग जीन्स जीन्सवर घालायची असून एका रिबनच्या सहाय्याने ती बाईकला जोडलेली आहे. जर चालक पडलाच तर एअरबॅगेत त्वरित हवा भरली जाते. शरीराचा खालचा भाग या एअरबॅगने पूर्ण कव्हर होतो. यामुळे चालकाला इजा होत नाहीच पण नंतर एअरबॅग मधली हवा काढून टाकता येते आणि गरज असेल तेव्हा एअरबॅग पुन्हा वापरता येते. या एअरबॅगचा बाहेरचा भाग फायबर पासून बनविला गेला आहे. स्टीलच्या तुलनेत हे फायबर १७ पट अधिक मजबूत आहेच पण वजनाला स्टीलपेक्षा आठ पटीने हलके आहे असे समजते.