बहारीन मध्ये होणार भव्य हिंदू मंदिर
युएई मध्ये दुबई, अबुधाबी पाठोपाठ आता बहारीन मध्येही भव्य हिंदू मंदिर उभारले जाणार असून त्यासाठी बहारीन सरकारने जमीन दिली आहे. या संदर्भात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहारीनचे पंतप्रधान सलमान बिन हमद अल खलिफा यांच्यामध्ये फोनवरून झालेल्या चर्चेत मोदींनी प्रिन्स सलमान यांना धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला दिले गेले आहे. या पत्रकानुसार या चर्चेत मोदींनी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, राजनीतिक, व्यापार, गुंतवणूक आणि अन्य विविध क्षेत्रातील सहकार्य यांचा आढावा घेतला.
प्रिन्स खलिफा यांनी पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारत, बहारीन राजनीतिक संबंध स्थापनेला २०२१-२२ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्याचा रौप्यमहोत्सव सध्या साजरा होत आहे. मोदींनी या बाबत ट्वीट करून एचआरएच प्रिन्स सलमान बिन हमद अल खलिफा यांना स्वामीनारायण मंदिरासाठी जमीन दिल्याबद्दल धन्यवाद दिले. तसेच करोना काळात बहारीन मध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांची चांगली काळजी घेतल्याबद्दल आणि त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण केल्याबद्दल आभार मानले. प्रिन्स खलिफा यांना भारत भेटीचे निमंत्रण मोदींनी दिले आहे.
युएई मध्ये मोठ्या संखेने भारतीय राहतात. दुबई मध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. दुबई मध्ये जेबेल ली येथील गुरु नानक दरबार शेजारीच भव्य हिंदू मंदिराची उभारणी सुरु असून हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. अबुधाबी येथेही ८८८ कोटी रुपये खर्चून स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम सुरु आहे. दगडी पारंपारिक शैलीचे अबुधाबी मधील हे पहिलेच मंदिर असून हे मंदिर १ हजार वर्षे सुस्थित राहील अश्या प्रकारे बांधले जात आहे.