मालदीव मध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार शिक्षा

मालदीव मध्ये भारत विरोधी निदर्शने करणाऱ्या नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सत्ताधारी मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टीने संसदेत एक विधेयक मांडले असून ते संमत झाले कि त्याचे कायद्यात रुपांतर केले जाणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने विधेयक संमत होण्यात अडचण येणार नाही असा दावा केला जात आहे. या विधेयकानुसार देशात भारत विरोधी निदर्शने हा गुन्हा मानला जाणार असून तो करणाऱ्याला २० हजार मालदीव रुफिया दंड, सहा महिने तुरुंगवास अथवा १ वर्षाची नजरकैद अश्या शिक्षेची तरतूद आहे.

नुकतेच सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात मालदीव नागरिक ‘इंडिया आउट’ टी शर्ट घालून भारत सरकारविरोधी घोषणा देताना, निदर्शने करताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार अशी निदर्शने द्विपक्षीय नात्यांवर प्रतिकूल परिणाम करतील त्यामुळे त्यावर बंदी घातली गेली आहे.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार मालदीवचे चीन समर्थक माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या तर्फे ही भारत विरोधी मोहीम चालविली जात आहे. नवीन विधेयक मांडण्यामागे संतुलित विदेश नीती स्वीकारणे हा उद्देश आहे. बाकी देशांची संबंध मजबूत आणि परिणामकारक राहावे असाही त्यामागे हेतू आहे. सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार भारत विरोधी निदर्शने थांबविण्यासाठी कठोर कायदा हवा कारण आमची आणि भारताची सुरक्षा एकमेकांवर अवलंबून आहे.