गोलकीपर श्रीजेश ठरला सर्वश्रेष्ठ अॅथलेट २०२१ पुरस्काराचा मानकरी

भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेशला सोमवारी वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द ईअर २०२१ हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्यापूर्वी २०१९ मध्ये हॉकी खेळाडू राणी रामपाल हिला हा पुरस्कार मिळाला होता.

भारतीय हॉकी महासंघाने ही माहिती देऊन श्रीजेशचे अभिनंदन केले आहे. हॉकी महासंघाने २०२१ साठी श्रीजेशची, उत्तम कामगिरी बजावणारा खेळाडू म्हणून या पुरस्कारासाठी शिफारस केली होती. यंदा या पुरस्काराचे ९ वे वर्ष आहे. कोणाही अॅथलेट, टीम ने वर्षात केलेले उत्कृष्ट प्रदर्शन,सामाजिक प्रतिबद्धता, निष्पक्ष व्यवहार यांचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो. यदा १७ देशातील २४ खेळाडूंची शिफारस त्यांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय महासंघांनी केली होती.

यात ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट खेळाडूच्या निवडीसाठी मतदान घेतले गेले त्यात श्रीजेशला १,२७,६४७ मते मिळाली. दोन नंबरवर आलेल्या स्पेनच्या खेळाडू अल्बर्ट लोपेज पेक्षा श्रीजेशची मते दुपटीने अधिक आहेत असे समजते. भारतीय हॉकी महासंघाने श्रीजेशला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

३३ वर्षीय श्रीजेश याला नुकताच देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार दिला गेला आहे. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये हॉकी संघाने ब्राँझ पदक कमाई केली आहे. हॉकी महासंघाने श्रीजेश याची सर्वश्रेष्ठ गोलकीपर म्हणून निवड केली होती. श्रीजेशने २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतला होता. रिओ स्पर्धेत तो भारताचा कप्तान होता.