अखिलेश यादव यांची इतकी आहे संपत्ती

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील करहल या अतिसुरक्षित मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. या निमित्ताने भरलेल्या अर्जात त्यांनी नियमानुसार संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार अखिलेश, पत्नी डिम्पल आणि कन्या अदिती यांची एकत्रित संपत्ती ४०.४ कोटी असल्याचे नमूद केले गेले आहे. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाच्या अन्य अनेक उमेदवारांनी त्यांची संपत्ती अब्जावधी असल्याचे नमूद केले असताना अखिलेश यांची संपत्ती इतकी कमी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अखिलेश प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. ३१ जानेवारी रोजी त्यांनी त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी एकूण चल संपत्ती ८ ,४३,७०,६५० असल्याचे नमूद केले असून पत्नी डिम्पल यांची चल संपत्ती ४ कोटी ७६ लाख,९० हजार ९८६  रुपये आणि मुलगी अदिती हिची संपत्ती १० लाख ४० हजार असल्याचे नमूद केले आहे. अचल संपत्ती मध्ये अखिलेश यांची सम्पत्ति १७ कोटी २२ लाख ८५८ तर डिम्पल यांची ९,६१,९८,९१८ असल्याचे म्हटले आहे. दोघाची मिळून २६ कोटी ८३ लाख ९९ हजार ७७६ रुपये अचल संपत्ती आहे.

अखिलेश यांनी सर्वप्रथम २००० साली कनोज येथून लोकसभा निवडणूक लढविली होती व त्यानंतर २००४ मध्ये येथूनच पुन्हा निवडणूक लढविली  तेव्हा त्यांची संपत्ती २ कोटी ३१ लाख होती. त्यानंतर २२ वर्षात यांची संपत्ती ४०.४ कोटींवर गेली असून ती १७ पटीने वाढली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादीचे सरकार असताना अखिलेश यांची संपत्ती चौपट वाढली होती तर योगी सरकार काळात त्यात १० टक्के वाढ झाली आहे.