म्हणून धोनीकडे नाही फोन

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत धोनी विषयी बोलताना ते धोनीला फोन करत नाहीत कारण धोनी कडे फोन नाही असा खुलासा केल्यापासून कॅप्टन कुल, माही फोन का वापरत नाही याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरु झाली आहे. धोनी संदर्भात असे बोलले जाते कि तो वैयक्तिक आयुष्य फार कसोशीने जपतो आणि मैदानात किंवा मैदानाबाहेर सुद्धा लाईम लाईट पासून दूर राहतो. संघातील कुणाही खेळाडूचा फोन आला तरी धोनी तो घेत नाही. त्यामुळे क्रिकेट खेळत नसेल तर माही कुठे आहे हे त्याच्या साथीदारांना शोधणे अवघड होते. धोनी सहकारीच नव्हे तर कुणाचाच फोन घेत नाही अशी त्यांची प्रसिद्धी आहे.

याबाबत धोनी खुलासा करतो, त्याच्यात आणि टेक्नोलॉजीमध्ये खूप अंतर आहे. तो टेक्नोलॉजीचा वापर फार क्वचित करतो. जेव्हा त्याला त्याच्या खेळाचे व्हिडीओ दाखविले जातात तेव्हा तो ते पाहतो, त्यात काय चुकतेय काय बरोबर याचा आढावा घेतो. टेक्नोलॉजीचा वापर करून घ्यायला हवा हे त्याला कळते. पण फोन मुळे त्याचे लक्ष विचलित होते त्यामुळे तो फोन वापरत नाही. त्याची मुलगी जीवा हिचा २०१५ मध्ये जन्म झाला तेव्हा माही परदेशात वर्ल्ड कप खेळत होता. मुलगी झाल्याचा फोन पत्नी साक्षीने धोनीचा साथी सुरेश रैना याच्या फोनवर केला आणि सुरेशने माहीला कन्यारत्न झाल्याची बातमी दिली होती.

वीरेंद्र सेहवाग एक आठवण सांगताना म्हणतो, माही बीसीसीआयच्या सचिवांचा फोन सुद्धा उचलत नाही. शेवटी त्यांनीच एक फोन माहीला दिला आणि या फोनवर फक्त आमचा कॉल येईल तो घे अशी विनंती केली होती. माहीचे मॅनेजर अरुण पांडे यांच्या कडे धोनी साठी येणारे फोन घेण्याची जबाबदारी आहे. बीसीसीआय किंवा अन्य दोस्त किंवा आणखी कुणी पांडे यांच्या माध्यमातुनच धोनीबरोबर फोन वर संपर्क साधू शकतात.