राफेल नदालने रचला नवा इतिहास, जिंकले २१ वे ग्रँड स्लॅम

स्पेनच्या राफेल नदाल याने टेनिस जगतात नवा इतिहास रविवारी रचला. ३५ वर्षीय राफेलने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत २५ वर्षीय रशियन टेनिस स्टार मेदवेदेव याला पाच सेट मध्ये पाच तास २४ मिनिटे चाललेल्या सामन्यात कडवी झुंज देताना २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असे पराभूत केले. त्याच्या करियर मधले हे दुसरे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद असून एकुणात २१ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

ग्रँड स्लॅमच्या १४५ वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक पुरुष एकेरी खिताब जिंकण्याचा पराक्रम राफेल नदालने केला आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोकाव जोकोविचला त्याने मागे टाकले आहे. या दोघांनी २०-२० ग्रँड स्लॅम जिंकली आहेत. २००९ मध्ये राफेल ने प्रथम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती त्यानंतर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी त्याला १३ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

अंतिम सामन्यात पहिला सेट मेदवेदेवने जिंकला तर दुसरा सेट त्यांचे टायब्रेक मध्ये जिंकला. त्यानंतर मात्र राफेलने हिम्मत हरू न देता, संयम राखून खेळ केला आणि पुढचे दोन सेट सलग जिंकले. त्यामुळे सामना पाचव्या सेट मध्ये गेला आणि अधिक रोमांचक बनला. त्यात अखेर राफेलने शेवटचा सेट जिंकून मेदवेदेवचा पराभव केला. महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने अमेरिकेच्या डेनियल कॉलिन्सला सरळ सेट मध्ये पराभूत केले आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला बनण्याचा मान मिळविला.