युक्रेन मधील नागरिक रशियाशी लढण्यास सज्ज

रशियाशी मुकाबला करण्यास युक्रेन मधील सर्वसामान्य नागरिक सुद्धा कंबर कसून तयार झाले आहेत. युक्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक खोट्या बंदुका घेऊन प्रतिकाराचा सराव करत असून युक्रेन सैन्याकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात तरुण, मध्यमवयीन आणि जेष्ठ नागरीक सुद्धा हिरीरीने सहभागी होत असल्याचे दृष्य रस्त्यातून दिसत आहे. रशिया युक्रेन सीझफायर घोषणा झाली असली तरी युक्रेन आणि रशिया मधील तणाव कायम आहे. रशियन सैन्य जमीन आणि समुद्रात घेराबंदी करत असल्याने पूर्व सीमेवर युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युक्रेनच्या अनेक शहरात सैन्याने युध्द सरावात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी होर्डिंग लावली आहेत. त्यात आपापल्या घरांचे रक्षण कसे कराल हे शिकून घ्या असे म्हटले गेले आहे. देशात प्रादेशिक सुरक्षा दलाची स्थापना २०१४ मध्ये रशियाने क्रीमियावर कब्जा केल्यानंतर करण्यात आली होती. ही प्रादेशिक सुरक्षा सेना सर्वसामान्य नागरिकांना बंदूक चालविणे, छापेमारी करण्याचे प्रशिक्षण देते. या सेनेच्या मदतीने लाखो नागरिकांना प्रशिक्षण दिले गेल्याचे सांगितले जात आहे.